| पक्ष्यांसाठी पाणवठे हवेत |
| गुरुवार, १२ मे २०११ पक्ष्यांनी अन्न शोधणे ही त्यांची नैसर्गिक क्रिया आहे. बर्ड फीडर म्हणजे पक्ष्यांचा नैसर्गिक जीवनक्रम बदलणे-आळशी बनवणे-माणसावर अवलंबून ठेवणे असे माझे मत आहे. शहरी जीवनशैलीचा विचार केल्यास रोज आपण कित्येक टन अन्न वाया घालवतो. टाकून देतो. असे अन्न, भाजीपाला, कचऱ्यामधील कीटक, अळय़ा इ.मुळे पक्ष्यांना खाण्याची कमतरता नसावी असे वाटते. पक्ष्यांसाठी आवश्यक असलेली फळझाडे आणि घरटी करण्यासाठी योग्य अशा वृक्षांची लागवड करणे जरुरीचे आहे. परंतु सर्वसाधारणपणे पक्ष्यांना अन्नापेक्षा पाण्याची गरज जास्त आहे. पक्ष्यांना स्वच्छ पाण्यासाठी खूप शोध घ्यावा लागतो. त्याचे कारण शहरातील सर्व जलस्रोत नाहीसे झाले आहेत. विहिरी, तळी, हौद, झरे, ओढे, नद्या काहीही शिल्लक नाही. असेल तर फक्त गटाराचे पाणी. ज्यांच्याकडे थोडीफार जागा असेल त्यांनी शोभेच्या झाडांच्या ५० कुंडय़ा ठेवण्यापेक्षा एक तरी वृक्ष लावावा आणि बागेत बर्ड्स बाथ ठेवावा. त्याची आज नितांत आवश्यकता आहे. हा बर्ड्स बाथ पसरट आणि उथळ असावा म्हणजे अगदी लहान सूर्यपक्षीसुद्धा त्यात अंघोळ करू शकतील. पक्ष्यांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी वर्दळीपासून दूर बर्ड्स बाथ ठेवावा. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी आपल्या बाल्कनीत रोज एका थाळीमध्ये पाणी भरून ठेवावे. काही दिवसांनी परिसरातील पक्ष्यांना ती जागा माहितीची होईल. (बर्ड्स बाथमुळे माझ्या बागेत रोज किमान १००-१५० पक्षी येतात.) |
No comments:
Post a Comment