Wednesday, 26 October 2011

विस्मृतीतला दुर्ग न्हावी रतनगड


सह्य़ाद्री कोळून पिलेल्या एखाद्या जातिवंत भटक्याला विचारलं, की महाराष्ट्रातील किल्ल्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या जिल्हय़ात आहे, तर बिनविरोध नाशिक जिल्हय़ाची निवड होईल. इथे ‘धोडप’ सारखा सातमाळा रांगेचा सम्राट आहे, तर ‘सप्तशृंग’ सारखे भाविकांचे श्रद्धास्थानही आहे.प्राचीनतेचा वारसा जपणारा इंद्राई किल्ला इथे आहे, तर महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग साल्हेर, तोही या नाशिक जिल्हयातच. निसर्गाने अन् सह्य़ाद्रीने नाशिक जिल्ह्य़ातील गिरिदुर्गांना काही कमी पडू दिलेलं नाही.तुमच्यापैकी अनेक जण साल्हेरवर जाऊनही आले असतील.सर्वोच्च दुर्ग जरी असला तरी साल्हेरचा माथा गाठणं तितकसं अवघड नाही.हा साल्हेर सह्य़ाद्रीच्या ज्या डोंगररांगेत वसला आहे त्याला म्हणतात डोलबारी रांग.साल्हेरच्या पुढचे सालोटा़, मुल्हेर-मोरा-हरगड हे या रांगेतले दुर्ग म्हणजे भटक्यांची राजधानी! पण साल्हेरच्या परशुराम
altशिखरावर उभं राहून उत्तरेकडे नजर टाकली की एक बेलाग सुळक्यांची रांग दिसते.ही आहे सेलबारी अथवा शैलबारी रांग.आणि यातला बिनीचा दुर्ग म्हणजे न्हावी रतनगड. अभेद्यपणाचे आणि दुर्गमतेचे शिखर गाठलेला.चढाईसही तितकाच आव्हानात्मक. लांबून बघताना याचा उत्तुंग सुळका अस्मानाला गवसणी घालताना दिसतो.परंतु त्यामागे दडलेला अनगड दुर्ग मात्र जवळ गेल्याशिवाय दर्शन देत नाही.महाराष्ट्रतील उत्तर- दक्षिण पसरलेली ही सेलबारी रांग चार गिरिशिखरांची.न्हावी रतनगड़, तांबोळ्या डोंगर आणि मांगी-तुंगीचे कातळसुळके यांनी सजलेली ही रांग. नाशिक जिल्ह्य़ातील बागलाणाचा इतिहासप्रसिद्ध मुलूख आणि गुजरातचा डांग जिल्हा यांच्यातील नाते सांगणारी. नगर
altजिल्ह्य़ातील भंडारदऱ्याच्या सान्निध्यातील रतनगडाच्या सरत्या वर्षांऋतूतील रूपावर भाळून दरवर्षी त्याची वारी करणारे अनेक जण आहेत.पण रतनगडाशी नामसाधम्र्य असलेल्या या न्हावी रतनगडाकडे मात्र ट्रेकर्सनी पाठ फिरवलेली दिसते. नाशिक जिल्ह्य़ातील सटाणा या तालुकास्थळापासून प्रवास सुरू केला की आपण तासाभरात ताहराबादला
पोहोचतो.ताहराबादहून पिंपळनेर रस्ता धरायचा आणि सुमारे १५ कि.मी वरच्या भिलवड गावात येऊन पोहोचायाचं.पिंपळनेर रस्त्यावर मांगी-तुंगीच्या दिशादर्शक कमानीपासून डावीकडे वळालो की ६ कि.मी.वर भिलवड आहे.हा मांगी-तुंगीचा पायथा.सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांची तंगडतोड केली की मांगी- तुंगीच्या सुळक्यांखाली आपण येतो.पण आपल्याला न्हावी रतनगडाला जायचं असल्याने मांगी-तुंगीचा नाद सोडायचा आणि भिलवड गावातून अध्र्या तासात काहीशा कच्च्या रस्त्याने न्हावी रतनगडाचा पायथा गाठायचा.गावाचे नाव वडाखेल. एक लहानशी आदिवासी वस्ती.गावाच्या एका बाजूला न्हावी रतनगडाचा सुळकेवजा किल्ला तर दुसऱ्या बाजूला तांबोळया डोंगर. न्हावी
रतनगडाच्या कडयातलं नेढंही वडाखेलमधून स्पष्ट दिसतं आणि पाहताक्षणी कुतूहल जागृत करतं. गावातून शेतं तुडवत निघायचं आणि पंधरावीस मिनिटात पाताळवाडी गाठायची.गावाचं नाव जरी ‘पाताळवाडी’ असलं तरी गाव बऱ्यापैकी उंचीवर आहे. पाताळवाडीतील ग्रामस्थ मात्र आतिथ्यशील आहेत.त्यांच्यातील एकाला वाटाडया म्हणून बरोबर घेतलं की वाट शोधण्याचे कष्ट वाचतात.पाताळवाडीतून एक पायवाट समोरच्या टेकाडाला वळसा घालून त्याच्या माथ्यावर विसावली आहे.आपण अध्र्या पाऊण तासात इथं पोहोचलो की चढाईचा पहिला टप्पा इथे संपतो.सध्या इथे एक देवाचे ठाणे असून त्याभोवती रंगीत झेंडे लावले आहेत.ही आपली वाट बरोबर असल्याची खूण.आता आजूबाजूचा प्रदेश नजरेसमोर तरळायला लागतो.या पठारावरून दोन वाटा फुटतात.एक जाते ती किल्ल्याच्या बेलाग कडयावर खोदलेल्या पायऱ्यांवरून, तर दुसरी किल्ल्याच्या कातळकडयाखालून.पहिली वाट तशी बऱ्यापैकी कठीण आणि तितकीच जोखमीची.त्यामुळे आपण दुसऱ्या वाटेचे बोट धरून चालायला लागायचं.या वाटेवर सप्तशृंगी देवीचे एक देऊळ तारेच्या कुंपणांनी बंदिस्त केले आहे.आता वाट वरच्या बाजूला वळून कडयाखालून जायला सुरूवात करते.आपणंही तसंच जायचं.या वाटेवर पाण्याची अनेक खांबटाकी, खोदीव टाकी व पायऱ्या आहेत.किल्ल्याच्या कडय़ाच्या वाटेने गेल्यास या सगळया सुंदर दुर्गवैशिष्टयांचे दर्शन घेणे शक्य होत नाही.वर कठीणतेशी सामना करावा लागतो तो
वेगळाच. या वाटेने एका तासात भग्न दरवाजातून गडावर प्रवेश करायचा.नीट पाहिल्यास दरवाजाचे बुरूज मात्र अवशेषस्वरूपात दिसतात.गडाचा विस्तार फार नसला तरी त्याचा लांबुळका आकार मात्र लक्षवेधी आहे.गडमाथ्यावर वाडयाचे अवशेष आणि जोडटाक्याचा समूह सोडला तर बाकी काही नाही.पण खरं आव्हान मात्र पुढे आहे. आपल्याला लांबून दिसलेला किल्ल्याचा जो गगनचुंबी सुळका आहे त्याचा माथा गाठणं वाटतं तितकं सोपं नाहीये.टाक्यांपासून सरळ चालत गेलो की किल्ल्याला विभागले आहे ते त्याच्या नेढयाने. एक अतिशय चिंचोळी वाट या नेढयावरून किल्ल्याच्या माथ्यावर गेली आहे.जेमतेम एक माणूस जाऊ शकेल इतकीच ही वाट.पण दोन्ही बाजूला पाताळवाडीची पाताळस्पर्शी खाई आहे. अगदी तारेवरची कसरत करून गेल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर हुश्श म्हणायचं.अगदीच जर वाटत असेल तर आपण काय दिव्य पार करून आलोय हे पहायला मागे नजर टाकली तरी पाय थरथरतात. कोणाही अनुभवी ट्रेकरच्या काळजाचा ठोका चुकविणारी ही वाट आहे.या सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर झेंडय़ाची काठी लावलेली आहे.आता जरा निवांत व्हायचं आणि आपलं अभिनंदन करायला उभे असलेले किल्ले लक्ष देऊन न्याहाळायचे.समोर साल्हेर-सालोटा, मुल्हेर- मोरा-हरगड़ डावीकडे मांगी-तुंगीचे मनोरेवजा सुळके आणि तांबोळया, तर उजवीकडे गुजरातचा डांग जिल्हा लांबवर पसरलेला दिसतो.आपल्या मनात हे चित्र कायमचं कोरून घ्यायचं आणि पुन्हा नेढयावरची कसरत करून परतीच्या वाटेला लागयचं.न्हावी रतनगडाची ही सफर आडवाटेची तर आहेच पण साहसाचा अनोखा अनुभव देणारीही आहे.हा दुर्ग फारसा
अवशेषसंपन्न जरी नसला तरी स्वत:ची एक वेगळी मोहोर तो आपल्या मनावर उमटवून जातो.अनेक सह्य़शिखरांचे एका वेगळया कोनातून मनस्वी दर्शन घडवतो आणि नव्या आव्हानांचा स्वीकार करायला भाग पाडतो.

2 comments: