Wednesday, 26 October 2011

देश आणि कोकणाला जोडणाऱ्या महाडजवळील वरंध घाटाच्या डोईवर चढले, की भोवताली सहय़ाद्रीच्या डोंगररांगांचे जणू तांडव उभे राहते. भल्यामोठय़ा लांबलचक पसरलेल्या मुख्य रांगेला तितक्याच ताकदीच्या- चढाईच्या उपशाखा फुटल्या आहेत. धडकी भरवणाऱ्या या डोंगररांगा, त्यांचे सरळसोट सुळके-कडे, निबिड अरण्य, घाटवाटा आणि ते रोखणारे गडकोट या साऱ्यांनी जणू इथे ‘गोंधळ’ मांडला आहे. या गुंत्यातच एक दुर्गरत्न कधीचे वाट हरवून बसले आहे- दुर्ग कांगोरी ऊर्फ मंगळगड! या कांगोरीकडे जायचे म्हणजे वरंध घाटाच्या पायाशी असलेल्या माझेरी गावी पायउतार व्हायचे. इथून उत्तरेकडची एक वाट शिवथरघळकडे निघते, तर दक्षिणेची डोंगरदरीतून तळे, किये गावांना भेट देत कांगोरीच्या पायाशी पिंपळवाडीत थांबते. पण या वाटेने जायचे म्हणजे ‘विनोबा एक्स्प्रेस’चे तिकीट काढायचे आणि पाच-साडेपाच तासांची पायपीट करायची! कांगोरीला यायला दुसरा मार्ग महाडहून! महाडहून या पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय. दिवसभरात चार-पाच फेऱ्या. या एसटीने ढालकाठी, खरवली, रूपवली या कोकणी गावांची भेट घेत पिंपळवाडीत यायचे. एकूणच पुण्या-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवत कांगोरीकडे पावले वळवायची. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोयीची. इथे आपली पथारी लावायची आणि भल्या सकाळी गडाला भिडायचे! गडावर जाण्यासाठी पिंपळवाडीच्या पूर्वेला असलेल्या शेडगेवाडीपर्यंत यावे. इथून एक वाट गडावर चढते. उंची अदमासे अडीच हजार फूट! तासा-दीड तासात आपण गडाच्या दरवाजात हजर होतो. दरवाजाच्या कमानीने कधीचीच मान टाकलेली, तसे भोवतीचे बुरूजही आता थकलेले! हे सारे ओलांडत आत शिरावे ते थेट गडाच्या माचीत! अद्भुत माची पूर्वेकडे माची आणि पश्चिमेकडे त्याहून उंचीचा बालेकिल्ला ही कांगोरीची रचना! यातील पूर्वेकडची माची म्हणजे या गडाचे एक अद्भुत रूपच! तिला पाहिले, की प्रतापगडाच्या माचीची आठवण होते. चांगली अर्धापाऊण किलोमीटर लांबीची ही माची
altसमोरच्या मुख्य डोंगररांगेतील कामथे घाट-अस्वल खिंडीवर नजर ठेवते. हिची तट-बुरुजांची चिलखते अद्याप शाबूत आहेत. टोकाकडे एक भरभक्कम लढाऊ बुरूजही! साऱ्या गडावरच गवत माजलेले असल्याने या गवताखाली हा सारा ठेवा मात्र झाकलेला आहे. एखादा ऐवज लपवून ठेवावा तसा! इथेच टोकाशी थोडय़ाशा उंचवटय़ावर काळभैरवनाथाचे मंदिर! गंमत अशी, की हा आहे भैरव, पण काही मंडळी त्याची कांगोरीदेवी म्हणून पूजा बांधतात! अगदी गडावरच मुक्काम करायचा असेल तर या मंदिराचा थोडाफार आसरा आहे. या मंदिराशिवाय या माचीतच अन्य एका चौथऱ्यावर ओळीने काही देवतांच्या झिजलेल्या मूर्ती दिसतात. शिबंदीची काही घरं आणि बुजलेली एक-दोन टाकीही दिसतात.
या माचीतून वर बालेकिल्ल्यात शिरावे. किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची घरे, तळी, पाण्याचे खोदीव हौद असे एकेक दिसू लागते. पण मोडल्या वाटा आणि थांबलेल्या वावराने या साऱ्यावर आता काळाने आपले हातपाय पसरले आहेत. यामुळे बांधकामे ढासळली, पाणवठे शेवाळले आणि सर्वत्र झाडांचे रान माजले! नाही म्हणायला या अडगळीत अत्यंत मधुर चवीचे एक टाके मात्र अद्याप भटक्यांच्या तृष्णेला शांत करते. या साऱ्या अडचणीतूनच वाट काढत फिरावे. तो या वास्तू त्यांच्या या व्यथेतून कांगोरीची कथाही सांगू लागतात. कांगोरीवर अनेकदा जाणे झाले. त्यातही दिवाळी संपली, की जावळीच्या या खोऱ्यातला ट्रेक ठरलेला असायचा. एका भेटीवेळेची एक गंमत सांगतो. भल्या सकाळी पिंपळवाडीतून गडावर आलो. काही मित्रांसमवेत गडावरच्या वास्तूंची मापे घेत होतो. याच वेळी पलीकडच्या गावातील काही लोक या कांगोरी मार्गे पिंपळवाडीकडे निघाले होते. त्यांनी पाहिले आणि एकमेकांत चर्चा सुरू केली. ‘सरकारी लोकं दिसत्यात. मोजमापं घेत्यात म्हणज्ये, गड पुन्हा बांधायला काढणार वाटतं!’ ..आमची बिचारी जनता अजूनही आशा बाळगून आहे, की सरकार येईल आणि त्यांच्या शिवाजीराजांच्या गडाचे गतवैभव पुन्हा उभे करेल! जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा हा प्रदेश! त्यांच्या राजवटीतच
कधीतरी हा गड अस्तित्वात आला आणि मोऱ्यांच्या अनभिषिक्त राज्याचा चाकर बनला. पुढे या मोऱ्यांचे शिवरायांनी पारिपत्य केले आणि कांगोरी स्वराज्याचा शिलेदार झाला. याच वेळी शिवरायांनी गडाचे नाव ठेवले ‘मंगलगड’! ज्याचेच पुढे झाले मंगळगड!! ऐन घाटमाथ्यालगत असल्याने त्याच्याकडे या वाटांवर लक्ष ठेवण्याचे काम आले. पुढे दुर्गमतेमुळे तो स्वराज्याचा तुरुंगही बनला. अनेक अपराध्यांना कांगोरीने आपल्या नजरकैदेत ठेवले. ज्यात पुढे इसवी सन १८१७ मध्ये मद्रास रेजिमेंटच्या हंटर आणि मॉरिसन या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. रायगड राजधानी बनल्यावर भोवतालच्या दुर्गचौकटीत कांगोरीचाही समावेश झाला. यामुळे ज्या ज्या वेळी रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी कांगोरीच्या फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. असा हा स्वराज्याचा शिलेदार इसवी सन १८१८च्या अखेरच्या घटकेपर्यंत निष्ठेने लढत राहिला. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात कांगोरीची ही धडपड कायमची शांत झाली. असे म्हणतात, इतिहास संपतो तिथे भूगोल उजाडतो! बालेकिल्ल्यावरून फिरताना भोवतालचा हा सहय़ाद्री पुन्हा मनाची कालवाकालव सुरू करतो. कांगोरीचा हा उभा-आडवा पर्वत बुद्धिबळातील वजिराच्या सोंगटीप्रमाणे या साऱ्यांमध्ये उभा असतो. भोवती काय काय दिसते.. अगदी उत्तरेकडून सुरुवात केली तर रायगड, लिंगाणा, कोकणदिवा, तोरणा, राजगड, कावळय़ा, वरंधची रांग, दुर्गाडीचे शिखर, रामेश्वर-कोळेश्वर-
महाबळेश्वरचे पठार, चंद्रगड ऊर्फ ढवळगड, प्रतापगड,  मकरंदगड असे सारे सहय़ाद्री मंडळच अंगावर येते. अनेक रांगा या कांगोरीकडे धावत येत असतात. तर काही दूरदूरवर अस्पष्ट होत अथांग सागरातील लाटांप्रमाणे सांगावा धाडत असतात. वेड लागायला होते, भान हरपायला होते, मंत्रमुग्ध व्हायला होते. या अशा अनगड गडांवर का जावे, या अशा शिखरांवर का पोहोचावे याचीच ही उत्तरे..! समोरच्या माचीतील भैरवाच्या मंदिरावरचा भगवा ध्वज दिमाखात फडफडत असतो. तुमच्या माझ्या अस्तित्वाची ती एकच काय जाणीव! 

No comments:

Post a Comment