Saturday 7 May 2011


लोकसत्ता इफेक्ट : ‘गप्पाष्टकासह चहा’मुळे कर्मचाऱ्यांचे तोंड पोळले!Print
राजूर, ७ मे/वार्ताहर
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भंडारदरा शाखेबाबत ‘बँक बंद करून चहासह गप्पाष्टक’ हे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची गंभीर दखल घेत बँकेचे नगर येथील विभागीय व्यवस्थापक लंके यांनी या संदर्भात संबंधितांशी संपर्क साधला. या बाबत सात दिवसांत अहवाल मागविल्याने कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. तक्रार करणाऱ्या ग्राहकांकडे संपर्क साधण्यात आला.
भंडारदरा येथील शाखेत ऑनलाईन सेवेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे निमित्त काढून गेल्या बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता उघडलेली ही बँक अध्र्या तासात बंद करून कर्मचारी चक्क चहा पिण्यास निघून गेले. ग्राहक बँकेत व्यवहारास आलेले, परंतु कर्मचारी मात्र बँक बंद करून बाहेर असे चित्र तयार झाले. कुठलीही सूचना वा सुट्टी नसताना बँक बंद असल्याचे पाहून ग्राहकांना धक्काच बसला. ग्राहकांनी अधिक चौकशी केली तेव्हा कॅशियर व शिपाई चहा पिण्यात मश्गूल असल्याचे निदर्शनास आले. बँकेचे ग्राहक चंद्रकांत बांगर, निवृत्त सैनिक यादव बांगर, माजी सरपंच बाबूराव अस्वले, चंद्रशेखर भागवत यांनी या संदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सूत्रे वेगाने हलली. या प्रकरणी चौकशी करून अहवाल मागवितानाच ऑनलाईन सेवा सुरळीत करण्याबाबत तज्ज्ञ कर्मचारी पाठविण्यात येणार असल्याचे बँकेतील सूत्रांनी सांगितले. वेळीच दखल घेतली गेल्याने बँकेच्या ग्राहकांनी समाधान व्यक्त    केले.

    1 comment: