Thursday 19 May 2011

जि. प. आदर्श प्राथमिक शाळा, भेकरेवाडी, ता. कर्जत, जि. रायगड
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समन्वय साधायचे ठरवले. आदिवासी क्षेत्रातील भाषा प्रयत्नपूर्वक अवगत केली. त्यामुळे मुलांचा कौटुंबिक व सामाजिक परिसर अभ्यासता आला. विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वास्थ्य यांकडे लक्ष देता आले. परिणामी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के इतकी झाली.
कर्जत तालुक्यातील भेकरेवाडी ही उंच डोंगरावर वसलेली वाडी. मी शिक्षक म्हणून भेकरेवाडीच्या शाळेत हजर झालो. शाळा डोंगरावर. या शाळेत पोहोचणे तसे कष्टाचे. त्यात इथल्या मुलांची भाषा ही आदिवासी बोलीभाषा.
शाळेत हजर झालो. तिथे कोणत्याही भौतिक सुविधा नव्हत्या. खुर्ची, टेबल तर सोडाच, पण साधा फळादेखील नव्हता. शाळेतील उंच-सखल जमीन उखळली होती. ती शाळा की गुरांचा गोठा अशी स्थिती पाहायला मिळाली. आता हे सर्व डोळ्यांसमोर आल्यावर चमत्कारिक वाटते; पण सहज सारे आठवून पाहिले, तर.. आजच्यापेक्षा कालची शाळा कशी होती- अगदी कुडामेडीची. शाळेत येणारी सर्व मुले आदिवासी बोलीभाषा बोलणारी. मुले शाळेत येऊन बसत, पण त्यांचे बोलणे मला कळत नसे.
एके दिवशी मंगळ्या नावाचा मुलगा मला म्हणाला, ‘‘गुरुजी मां बकरांक जातो.’’
‘‘जाऽऽ लवकर ये शाळेत.’’ असे म्हटल्यावर म्हणाला,
‘‘गुरुजी, मां येळचाची येईन.’’ मला वाटले, ‘येळचाची म्हणजे वेळ न लावता लगेच’ परंतु तो पुन्हा आलाच नाही. नंतर समजले, ‘येळचाची’ म्हणजे ‘संध्याकाळी’. त्यामुळे या भाषेचे कुतूहल वाटे. थोडे दिवस चेहऱ्यावरील भाव ओळखण्यापलिकडे काही करता येत नव्हते. नंतर मी त्यांना बोलीभाषेतील अनेक शब्द विचारत बसे. पुढे असे काही शब्द दिले आहेत.
बोलीभाषा           प्रमाणभाषा
* नंदर              लक्ष दे
* पुसकत कढ       पुस्तक काढ
* बूडी बीस         नीट बसा
* समदं कढलं       सगळे काढले
* धाई मार           धावत ये
* कुणकर चालला?  कुठे चालला?
असे करता करता बोलीभाषेतील दोनशे-तीनशे शब्दांचा संग्रह केला. त्यामुळे प्रत्येक विषयाशी संबंधित शब्दार्थ सांगणे सोपे गेले. तरीही मी नाराज होतो; परंतु नाराज होण्याने समस्या सुटणाऱ्या नव्हत्या. अडचणींवर मात करून मार्ग काढायचाच, असे मनाशी ठरवले.
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समन्वय साधायचे ठरवले. तिथल्या आदिवासी क्षेत्रातील भाषा प्रयत्नपूर्वक अवगत केली. त्यामुळे मुलांचा कौटुंबिक व सामाजिक परिसर अभ्यासता आला. विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वास्थ्य यांकडे लक्ष देता आले. मुलांच्या भावना, विचार, समस्या समजून घेणे सोपे गेले. परिणामी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के इतकी झाली.
ग्रामस्थांच्या सहकार्याने छोटी बाग तयार केली. शाळेचा परिसर आकर्षक दिसू लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले.
शाळेने घराचे व व घराने शाळेचे स्वरूप धारण करावे, अशी वातावरणनिर्मिती कशी होईल हे पाहिले. शाळेच्या बाहेरील ओटय़ावरच्या प्रत्येक दगडावर पाने, फुले, पशू, पक्षी, वस्तू यांची चित्रे काढून त्यांची इंग्रजी नावे लिहिली. त्यामुळे आदिवासी मुलांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती कमी झाली. मुले आवडीने शाळेत येऊन आनंदाने अध्ययन करू लागली. माझ्या शाळेला ‘रायगड जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार’ मिळाला, तेव्हा केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले.
एक काम संपले की दुसरे तयार असतेच. या सतत काम करण्याच्या जिद्दीने मला माझ्यातील शिक्षकक्षमता लक्षात आल्या. आज माझे अतिदुर्गम शाळेतील विद्यार्थीही पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या मनातील दडपण, भीती, दूर करून त्यांना बोलते केले.
‘‘गुरुजी, कवा यायचं शाळंत?’’
‘‘गुरुजीनं बोलायलं, चलारं साळंत.’’
‘‘आमच्या जाईल हिव येतं.’’
असे स्वानुभव सांगण्यास विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रवृत्त करत गेलो. विद्यार्थ्यांबद्दल वाटणाऱ्या आंतरिक जिव्हाळ्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी होण्यास मदत झाली. प्रयत्न केल्याने ‘विद्यार्थीकेंद्रित अध्यापन’ ही प्रक्रिया प्रयत्नसाध्य झाली.
बदलायची संधी सगळ्यांनाच मिळते. ती आपल्यापर्यंत नाही आली, तर आपण तिच्यापर्यंत जायला हवे, असे मानून मी अतिदुर्गम एकशिक्षकी शाळेत काम केले. आता आयुष्यभर तेच करीन. माझ्या व्यवसायाची प्रतिष्ठा उंचावीन!

No comments:

Post a Comment