Thursday 19 May 2011


डांगी नष्ट होताना..Print
विजय सांबरे, अकोले (नगर),गुरुवार, १९ मे २०११
आपल्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे नाशिक व अहमदनगर या जिल्ह्य़ांच्या पश्चिम पट्टय़ात डांगी जनावर सर्वदूर प्रसिद्ध आहेत. सह्य़ाद्रीच्या डोंगर रांगामुळे या परिसराला दुर्गमता आलेली आहे. जून महिन्यात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस मुसळधार कोसळतो. पावसाळ्यातील चार महिन्यात माणसालाही मोड फुटतात की काय, असे डांगण भागात म्हटले जाते. अशा या प्रतिकूल वातावरणात, दगड धोंडय़ांच्या देशात डांगी जनावर आपले अस्तित्व टिकवत आहे. न घासणारे खुरं व शरीरावरील तैलग्रंथींमुळे या परिसरात ‘डांगी’ अगदी सहजतेने वावरते.
नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी-घोटी परिसर, अकोले तालुक्यातील (जि. अहमदनगर) समशेरपूर, राजूर व कोतूळ परिसर व पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे डांगी जनावरे असायची. शेतीव्यतिरिक्त फक्त डांगीचा कळप पाळणे, जंगलात चरण्यास नेणे, गोठय़ात दोनदा सोड-बांध करणे, उन्हाळ्याच्या दिवसात चारा-पाणी कमी पडल्यावर कोकणात जनावरांसह स्थलांतर करणे व गायीचे दूध डोंगरदऱ्या ओलांडून बारा-तेरा मैलाची पायपीट करून दररोज विकणे. अशा जीवनशैलीत महादेव कोळी व ठाकर समाजाच्या कितीतरी पिढय़ा गेल्या.
मागील वीस वर्षांपूर्वी एक वेळ अशी होती की, अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टय़ात एका कुटुंबाकडे कमीत कमी वीस व जास्तीत जास्त शंभरपेक्षा अधिक डांगी जनावरे होती. पुढे अभयारण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्निबध चराईमुळे चारा कमी होऊ लागला. उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावू लागली. परिणामी जनावरांची प्रतिकार क्षमता कमी झाली. २००० सालाच्या दरम्यान पावसाळ्यात साथीचे रोग येऊन हजारो गाई, बैल, वासरं मृत्युमुखी पडली. ‘अँथ्रेक्स’सदृश रोगामुळे जनावरे मेल्याची माहिती सर्वजण सांगत असतात. आंबित-जानेवाडी- कुमशेत या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना या साथीचा फार मोठा फटका बसला. मेलेली जनावरे पुरण्यासाठी जे.सी.बी. माशिन आणावी लागली. किती तरी शेतकऱ्यांकडे ‘डांगी’ वंश राहिला नाही. एक वृद्ध शेतकरी डोळ्यात पाणी आणून सांगत होते की, जनावरे वळण्यासाठीची काठी आम्ही केव्हाच ठेवून दिली आहे!
डांगी जनावरे झपाटय़ाने कमी का होत आहे? बैल नाही म्हणून म्हशीच्या रेश्याने जमिनीची मशागत करण्याची वेळ का आली आहे? राजूर-घोटीच्या प्रदर्शनात पाहावयास मिळणारी डांगी खोंड पूर्वीइतकी शुद्ध वाटत नाहीत. कल्याण-सोपारा या प्राचीन बाजारपेठा डांगींनी फुललेल्या असायच्या. कुठे गेले हे वैभव? त्याचा शोध, कारणमीमांसा ‘लोक पंचायत’ संस्थेने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे आला ‘सहभागीय डांगी संवर्धन कार्यक्रम’!
मागील पाच वर्षांपासून लोकपंचायत संस्था जंगल-आदिवासी संबंधांवर संवर्धन, उपजीविका, हक्क-कर्तव्य व संघटन याविषयी अकोले तालुक्यातील ३० गावात कार्यरत आहे. शाश्वत शेतीसाठी जनावर पाळणे, पशुसंवर्धन आवश्यक
असते. या दृष्टीने गावपातळीवर डांगी पालकांसोबत संवाद सुरू झाला. बैठका, प्रशिक्षण कार्यशाळा, सहभागीय सर्वेक्षण (पीआरए) याच्या माध्यमातून डांगी संवर्धन कार्यक्रमाला दिशा मिळाली. लोकांनीही पुढाकार घेतल्याने ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन जो ‘महाराष्ट्र जनुक कोष’ उपक्रम सुरू केला. त्यात स्थानिक वाणांचे (बी-बियाणे, पाळीव प्राणी, जंगली वनस्पती, गवत, देवराया इत्यादी लोकसहभागातून संवर्धन करणे उपेक्षित होते. त्या कार्यक्रमाची जोड मिळाली. दुर्दैवाने ते काम फार आकार घेऊ शकले नाही. मात्र, एक दृष्टी त्यातून मिळाली. निवडक पंधरा गावातील १३५ डांगी पालकांचे सामाजिक-आर्थिक व पर्यावरणीय सर्वेक्षण संस्थेने केले. त्यातून काही ठळक मुद्दे पुढे आले. ते असे-
१. दरवर्षी उन्हाळ्यात जे लसीकरण शासनामार्फत होते, ते सर्व गावात पोहचत नाही. पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यक दुर्गम ठिकाणी पोहचत नाही.
२. डांगी जनावरांना वर्षभरात पावसाळ्यात व त्यानंतर हिरवा चारा उपलब्ध होतो. चार महिने वगळता उर्वरित काळात अत्यंत कमी दर्जाचा वाळलेला चारा खावा लागतो.
३. जनावरे दररोज ७-८ किलोमीटर चरण्यासाठी फिरतात, डोंगर दऱ्यातील वाटांमुळे थकतात व परिणामी दूध कमी मिळते.
४. कमी दर्जाच्या चाऱ्यामुळे हाडांची वाढ होत नाही व जनावरे खुजे राहतात. इ२२ कल्ल्िरू४२ या मूळ भारतीय जनावरांतील धिप्पाड देह व बांधा त्यांना मिळत नाही.
५. पाळीव प्राण्यांच्या विविधतेमध्ये ‘डांगी’ जनावरांची त्या रंगानुसार एकूण आठ प्रकारांची नोंद झाली. मण्यारा, शेवरा, बहाळा, खैरा, तांबडा, पारा, काळा व गवळा असे आठ उपप्रकार आजही आढळतात.
६. पाळी व प्राण्यांमध्ये म्हैस व शेळी यांनी डांगी जनावरांची जागा काही प्रमाणात घेतली आहे.
७. पूर्वी गावात शुद्ध डांगी वळू असायचा, आज मात्र ती परंपरा मोडलेली आहे. त्यामुळे पुनरुत्पादन होण्यात अडचणी येतात.
८. डांगी जनावरांमध्ये संकर करण्याचा शासकीय प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. डांगी सिमेन (गोठीव वीर्य) उपलब्ध होईल याची शक्यता कमी असते.
त्यामुळे आपल्या डोळ्यासमोरच एक स्थानिक, चिवट जात नष्ट होत चालली आहे.. नुसती एक जात नव्हे, तर त्याचबरोबर नष्ट होत आहे- आपल्याकडील जनावरांची संपन्न विविधतासुद्धा!

1 comment: