Thursday 19 May 2011

अभिजित पानसे यांचा २७ डिसें.च्या अंकातील ‘माझी मुलगी इंग्रजी माध्यमात शिकते; आणि मला मराठीचा अभिमान आहे!’ हा लेख वाचून ते म्हणतात तसे भुवया वगैरे काही उंचावल्या नाही; पण स्वत:च्या ढोंगीपणाचं समर्थन करता त्यांनी किती गफलती केल्या याचं मात्र हसू आलं. पहिल्यांदाच मनात विचार आला की, पानसेंसारखं महाराष्ट्रातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवायचे ठरवले तर काय होईल? अर्थात सर्वाना हे आजतरी शक्य नाही; पण असं झालंच, तर मात्र पानसेंना ‘मराठी शाळा टिकल्याच पाहिजे’ असं म्हणण्याची गरज राहणार नाही. खरं तर गरज म्हणण्यापेक्षा ‘राजकीय संधीच’ शिल्लक राहणार नाही, हा एक मुद्दा.
पानसेंचा दुसरा मुद्दा मात्र पटण्यासारखा आहे. तो म्हणजे आज इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक हुशार मुलं मागे पडली आहेत. (इंग्रजी येत असणारेही अनेक आहेत) इंग्रजी किंवा अगदी फ्रेंचदेखील येणं ही त्या अर्थाने जगण्यासाठी काळाची गरज बनली आहे. (अर्थात जे आज शाळेत जावू शकतात त्यांच्यासाठी. इंग्रजी सोडाच; पण मराठी शाळेचंही तोंड पाहू न शकणारे असंख्य आहेतच.) त्यामुळं इंग्रजी यायलाच हवं याविषयी काही दुमत नाही. पण म्हणून पानसे स्वत:साठी जो मार्ग वापरतात त्याच मार्गाने सर्व मुलांना चांगलं इंग्रजी येण्यासाठी गावोगावी इंग्रजी शाळा सुरू कराव्यात अशी मागणी करतील काय? जेणेकरून सर्वच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतील व आजच्या स्पर्धेत त्यांना यशस्वी होऊ देतील! शिवाय तेही आपल्या मुलांना पानसेंसारखं मराठी घरीच शिकवतील. कारण केवळ पानसेंच्याच मुलांना पुढे जायचे आहे असे नाही तर सर्वच पालकांची ती अपेक्षा आहे व ती गैरही नाही. असं झालंच तर मराठी शाळांची गरजच शिल्लक राहणार नाही व मग ‘मराठी शाळांतून चांगले इंग्रजी शिक्षण’ हा मुद्दाही निकाली निघेल. फक्त अशा पालकांना मराठी वाक्ये असलेली टी-शर्टस् वापरावे लागतील नाही तर पानसेंसारखी मंडळीच पुन्हा त्यांना ‘मराठी द्वेष्टे’ ठरवायला लागतील.
पण इंग्रजी शाळांची वरील मागणी पानसे किंवा तत्सम मंडळी करणार नाही. कारण ती त्यांच्या तथाकथित ‘राजकीय मराठी अभिमानाच्या’ आड येणारी ठरेल. त्यांच्या या ‘मराठी अभिमानी राजकीय भूमिकेखातर’ (?) ते ‘मराठी शाळा टिकल्याच पाहिजे व त्यातून चांगलं इंग्रजी शिकवा’ एवढीच मागणी करू शकतात. (अर्थात मागणीच फक्त) पानसेंचा तिसरा मुद्दा हा की ‘मराठीच्या विकासासाठी तिचा अभिमान बाळगणाऱ्यांनी ती वृद्धिंगत कशी होईल याचा विचार केला पाहिजे’ असे ते सांगतात. मात्र ‘मराठी घरी शिकण्याची’ त्यांनी शोधून काढलेली अफलातून शक्कल मराठीच्या विकास व वृद्धिंगत होत जाणाऱ्या प्रक्रियेलाच तडा देते. शाळेच्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार करीत मराठीला घराच्या भिंतींमध्ये बंदिस्त करण्याचा अजाणतेपणी (?) प्रयत्न पानसे करतात. असं झालंच तर मराठी घराचा उंबरठा कधी ओलांडू शकेल काय? पानसेंची ही शक्कल मराठीला अधिकाधिक संकुचिततेकडे घेऊन जाणारी नाही काय याचा सुज्ञ मराठी प्रेमी नक्कीच विचार करतील.

No comments:

Post a Comment