Wednesday 4 May 2011

तमाशा कलावंतीण बनली बचतगटाची

तमाशाच्या फडावर नाचताना लोकांच्या नजरांनी तिचा जीव गुदमरून जायचा. आपलाही इतरांप्रमाणे संसार असावा असं तिला मनापासून वाटायचं. त्यासाठी पायातले घुंगरू फेकून द्यायचा विचार मनाला शिवायचा. पण पोटाची खळगी कशी भरणार, हा प्रश्न खायला उठायचा. असाच एकेदिवशी केला निर्धार अन् पडली बाहेर.. आता स्वतची शेती कसते. एक नव्हे तर तब्बल डझनभर बचतगटांची अध्यक्ष आहे. ‘पायातील चाळ ते बचत गटाच्या अध्यक्षपदाची माळ..’ ही जीवनकहाणी आहे शिवकन्या नंदा कचरे तमाशा कलावंतीणीची..
शिवकन्या ही पाथर्डी तालुक्यातील कोरडगावमधील रहिवासी नंदा कचरे यांची मुलगी. कोल्हाटी समाजातील असल्याने घरी जन्मताच नाचगाणं. चौथीपर्यंत कशीबशी शिकली. त्यामुळे लिहण्याऐवजी पुन्हा नाचगाणं सुरू झालं अन् तमाशाच शाळा बनली. सन २०००मध्ये घराच्या मंडळींनी शिवकन्यावर टाकली फडाची जबाबदारी. ढोलकीसम्राट शिवकन्या बडे नगरकर या नावाने फड उभा राहिला. अल्पावधीत तिने तो नावारूपालाही आणला. पेटी, तुणतुणे, डफडे, तबला अशी सर्वच वाद्य वाजविण्याबरोबर ती नृत्यातही पारंगत होती. सिनेअभिनेत्री मधू कांबीकर यांनीही यासाठी तिला शाबासकी दिली. आर्यभूषणच्या व्यासपीठावर, तसेच ऑर्केस्ट्रा, लावणी व कला केंद्रातही ती नाचली. तब्बल ६०-७०जणांचा तिच्या तमाशात राबता होता.
एकाद्या गावात तमाशा लावला की कुणी तरी याययं आणि मी अमूक-तमूक पक्षाचा पदाधिकारी आहे. मला फुकटात तमाशाला सोडा, अशा आठवणी शिवकन्या सांगते. गुंड मंडळी तर पिच्छाच पुरवायची. नाचत असताना अदाकारी पाहून नोटांचा पाऊस पडायचा. मात्र, त्याला वखवखलेल्या नजरांची किनार असायची. गावाकडे आले तरी लोक तमाशातली बाई म्हणून हिणवायचे. मान, सन्मानाचा विषय लांबचा.
नांदेड जिल्ह्य़ातील गोडे मालेगावला तमाशा स्पर्धा झाली. त्यात गावोगावचे फडकरी उतरले होते. पण आम्ही पहिला नंबर मारला. दुसऱ्या वर्षीही गेलो. त्यावेळी गरोदर होते. दिवसही भरले होते. मग काय झाले बाळंतीण. मुलगा झाल्याने आनंदाचे वातावरण होतं. परंतु नाचता येणार नाही याची खंतही होती.
स्पर्धा सुरू झाली. माझ्या अदाकारीसाठी प्रेक्षक हटून बसले होते. मी नाचायला यावं यासाठी त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं. पुन्हा बांधली हिंमत अन् उतरले स्टेजवर. पायाला चाळ बांधले आणि नाच नाच नाचले. मग काय लोकांनी अक्षरश पैशाचा पाऊस पाडला. पण मनाला कशाच्या तरी इंगळया डसत होत्या. बहुतेक असं जीणं आता यापुढं नको, असं वाटत असेल कदाचित.
मग तडक उठले अन् गाव गाठलं. फड केला आईच्या हवाली. घरची पंधरा एकर जमीन होती. ती कसायला सुरूवात केली. २००३ची ही गोष्ट. जनावरांच्या धारा काढणं. नांगरट स्वत शिकले. तमाशात असताना मोठमोठय़ा पेटय़ा उचलल्या होत्या. ट्रकही चालवायला शिकले होते. मग ट्रॅक्टरही शिकले आता जेसीबीही चालवायला येतो.
गावात एकदा बचत गटाची कसली मिटिंग होती. त्या मिटिंगला मला काहीजणींनी बोलावले. गावात माझ्याबरोबर त्या टायमाला कोणी जास्ती बोलत नव्हतं. यात बहुतेक माझा स्वभाव आडवा येत असंल. कारण मी मूळात रागीट बाई. त्या मिटिंगीकडे काही मी फिरकले नाही. पण एकदा काय झालं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगीनी भारती असलकर माझ्या थेट घरीच आल्या. त्यांनी मला हे बचत गटाचं प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे केला कोल्हाटी समाजातील महिलांचा बचतगट.
पहिल्या पहिल्यांदा बचतगटात गेलं तरी दुसऱ्या बायका मला बघून कुजबुजायच्या. त्यांच्यापासून फटकून बसावा लागत. बचतगटाचं मला पटलं होतं. हिंमत केली अन् कर्ज काढून घेतल्या जरशा गाई. काळाच्या ओघात प्रगती होत गेली. पतीने साथ दिल्याने संसाराचा गाडा सुरळीत चाललायं. दोन बहिणींनी बीसीएला अ‍ॅडमिशन घेतलंय. माझी दोन्ही मुलं इंग्लिश मीयिमच्या शाळेत जातात. माझ्या बचत गटातील कामामुळे की काय गावातली लोकं माझ्याकडं समस्या घेऊन यायला लागली. मीही त्या सोडावयाचे. त्या लोकांना मी आपली वाटायला लागले, ही फार मोठं समाधान. तमाशात नाचताना पडणारा नोटांचा पाऊससुद्धा याच्यापुढं फिक्का! बचत गटाच्या चळवळीने खरंच मला माणूसपण मिळवून दिलं. गावासाठी अगोदर मी केवळ तमासगिरीण होते. आता तेच लोक मला ताई म्हणून मान देतात. हा कशाहीपेक्षा मोठा पुरस्कार समजते. पूर्वी पैसा होता, पण सन्मान नव्हता.  बचतगटाच्या चळवळीला मी आता वाहून घेतलंय. गावात बारा बचतगट आहेत, त्यांची एक समिती तयार केलीय. या समितीची मी गेल्या सहा वर्षांपासून अध्यक्ष आहे. तमाशात नाचणाऱ्यांनाही असाच मान मिळावा यासाठी मी प्रयत्न करते. त्यांना या धंद्यातून बाहेर काढायचं उद्दिष्ट ठेवलंय.
सन २००७ साली मंगोलीया देशाचे १८ प्रतिनिधी कोरडगावला बचतगटाच्या कामाची पाहणी करायला आले होते. या लोकांचे मी ढोलकी वाजवून स्वागत केले. त्यांनी माझी नंतर विचारपूस केली. पायातले चाळ ते बचत गटाच्या अध्यक्षपदाची माळ.. हा माझा जीवनप्रवास पाहून ते थक्क झाले. शिवकन्याताई हा जो काही प्रवास झाला तो भारतीताई यांच्यामुळे, असं सांगून टाकतात. एकेकाळची ही तमाशा कलावंतीन आता परिसरातील बचतगटाची आधारवड बनलीयं.    

No comments:

Post a Comment