Thursday 19 May 2011

भारतीय प्राचीन संस्कृतीत ‘गोधन’ म्हणजे राजाची श्रीमंती मानली जायची. देशाची मजबुती सोन्याच्या, चांदीच्या साठय़ावर ठरते तशी गोशाळा उत्तम गाईंच्या प्रजाती, सशक्त वळू म्हणजे प्राचीन काळात वैभव मानले जायचे. भारतातील गुजरात प्रांतातील ‘गीर गाय’ जगभरात नेली गेली. ब्राझील, अमेरिका देशाने तर संकरीकरणासाठी ‘गीर जात’ वापरली. सध्या चीनसारखा बलाढय़ देश ‘मुऱ्हा’ या अत्यंत दुर्मिळ दुधाळ अशा म्हशीच्या प्रजातीवर अभ्यास संशोधन करत आहे. भारतातील काही जाती तर नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. वैविध्यपूर्ण गोवंशाच्या सुमारे २८ ते ३० जाती भारतात आढळतात. आपली ही राष्ट्रीय संपत्ती आहे. अशा वातावरणात भारतीय आयुर्वेद ग्लोबल होत असताना गोवंशप्रेमी ग्रामविकास संमेलन दि. १६ व १७ मे २०११ रोजी राज्यस्तरावर लांजा, जि. रत्नागिरी येथे नवजीवन विकास सेवा संस्थेने आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील गोवंश अभ्यासक, गोशाळाचालक, आयुर्वेदीय गोवंशाधारित औषधी उत्पादक गोपालन करणारे राज्यभरातील गोपालक शेतकरी या सर्वाची उपस्थिती या गोवंशप्रेमी-ग्रामविकास संमेलनाला असणार आहे.
ग्रामीण भागालाही सध्या शहरीकरणाचा स्पर्श होत आहे. सारवण, रांगोळीचा सडा, जात्यांची घरघर, धारोष्ण दूध या गोष्टी संपतच चालल्या आहेत. मात्र निसर्गसंपन्न कोकणात अजूनही ‘गावठाण’ टिकून आहे. मुबलक पाऊस, कसदार लोह व मँगेनीजयुक्त माती, कष्टाळू, चिवट, काटक-काबाडकष्ट करणारा शेतकरी, मोजून मापून असलेला, कर्जाला घाबरणारा शेतकरी व समाज हीच कोकणची संपत्ती आहे. मात्र तरीही लहरी निसर्ग माकड-वानरांचा उच्छाद, गवा-रेडय़ांचे कळप, तर कधी डुकरांचा उपद्रव ही नैसर्गिक संकटे पाचवीलाच पुजलेली! आंबा बागायतदार, नारळ, काजू, मसाला पीक शेतकरी वाटचाल करतातच. या सर्व वर्गातील शेतकऱ्यांना, कोकणातील शेतकऱ्यांना गोसाक्षरता, गोविज्ञान अभियानातून सजग-सावध करण्याचे काम नवजीवन विकास सेवा संस्था करीत आहे.
या गोपालन आणि गोविज्ञान जाणीव जागृतीचाच राज्यस्तरावर प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ग्रामविकास संमेलनाचे राज्यस्तरीय आयोजन लांजा शहरात केले आहे. अशा प्रकारचा राज्यस्तरावरील हा पहिलाच उपक्रम आहे.
सेंद्रिय शेतीचे महत्त्व जगातील अनेकांना पटलेले आहे. ऑस्किटोसीनयुक्त (कृत्रिम पान्हा फोडणारे संप्रेरक) दूध, भेसळयुक्त व रसायनमिश्रित दूध ही अवघ्या समाजाचीच डोकेदुखी आहे. या दूधभेसळखोरांना फाशीची शिक्षा कधी होईल तेव्हा होवो, परंतु आज आम्हाला आम्ही पितो त्या दुधाबाबतीत जागृती हवीय. ‘पंचगव्य’ हे गाईच्या मूत्रापासून बनवतात, शेतीत फवारणीसह ते पिकांना उपयुक्त आहे. ‘गोमूत्र अर्क’ या उत्पादनाचे जागतिक पेटंट आहे. जलोदर, हृदयविकार यांसारख्या दुखण्यांवर विकार व व्याधींवर गोवंशाधारित औषधे ही रामबाण उपाय आहेत. गाईचे दूध लहान बाळांसाठी औषधाइतकेच उपयुक्त आहे. गाईचे तूप तर आयुर्वेदतज्ज्ञ, वैद्य सर्वचजण खायला सांगतात. सकाळ-संध्याकाळ अग्निहोत्र करणारे अग्निहोत्र उपासक गोमय म्हणजे गाईचे शेण, गोवऱ्या, शेणी करून वापरतात. सध्या फॅशनच्या, टापटिपीच्या वेडापायी कित्येकजण चौकोनी शेणी, वडय़ा, साबणाच्या आकारात शेणी, गोवऱ्या वापरतात. या सगळ्याचा परामर्श घेतला किंवा ही यादी वाचली तर एक गाय किती उत्पादन देते ते लक्षात येईल. एका गाईपासून बनवता येणारी ही ‘प्रॉडक्ट लिस्ट’ एका कुटुंबाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करू शकते.
महाराष्ट्रातील अनेक गोवंशप्रेमी गोपालन आणि सेंद्रिय शेती या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा सधन झाले आहेत. तानाजी निकम या सांगलीतल्या शेतकऱ्याने गिनीज बुकात गोपालनातून सेंद्रिय शेतीचा विक्रम नोंदवला. जळगावच्या शरद पाटील या शेतकऱ्याने एका ‘लाल कंधारी’ जातीच्या ‘लक्ष्मी’ नावाच्या गाईच्या यशस्वी पालनातून आजवर दोन लाख पन्नास हजार रुपये पारितोषिक राज्यभरातून पशुप्रदर्शनातून मिळवले. याच गोपालक शेतकऱ्याला अडीच किलो चांदी बक्षिसात मिळाली. शिवाय राजपथावर गाईला घेऊन सन्मानाने चालण्याचाही बहुमान मिळाला. या यशस्वी यशोगाथेसह सुरेश वाघधरे (सोलापूर), अशोक रानडे (नाटे. ता. राजापूर) कृष्णाजी राजाराम अष्टेकर (जि. जालना) यांनी गोवंशपालनातून शेतीत प्रगती साधली आहे. ‘नवजीवन’ संस्थेला या यशोगाथा कोकणातील शेतकऱ्यांतून घडवायच्या आहेत.
कोकण म्हणजे मागास प्रांत, कोकण म्हणजे मनीऑर्डरकडे डोळे लावून बसलेल्या खेडुतांचा, शेतकऱ्यांचा समाज, हा समज कोकणाने पार पुसून काढलाय. आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांनी स्वत:ची ओळख बनवलीय. कृषी पर्यटनाचा पायंडा राज्यभरात चांगलाच रुजतोय. अशा पाश्र्वभूमीवर राज्यभरातील गोवंशप्रेमी, प्रयोगवीर कोकणातील लांजा तालुक्यात एकत्र येत आहेत. आपापल्या बेटांवर, आपल्याच प्रांतातील मर्यादित कार्य वैचारिक आदान प्रदान करीत सर्वाना सांगितले जाईल. कोकणातील शेतकऱ्यांना ही सर्व दिग्गज मंडळी गोवंशाधारित यशाचे रहस्य सांगतील. यानिमित्ताने राज्यभरातील गोवंशाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आपणाला नक्की काय करायला हवे आहे याचे भान येईल. गोठय़ाची रचना असो, औषधे असोत वा जनावरांची निवड किंवा उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन या सर्वाची माहिती मिळेल. गोवंशाधारित बाजारपेठेचा परिचय द्यायला सुनील मानसिंहका यांच्यासह रवींद्र प्रभुदेसाई (पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. ठाणे) उपस्थित असतील. गोरक्षणासह गोवंशपालन, व्यवसाय संवर्धन असा संतुलित दृष्टिकोन संयोजकाचा आहे.
गाय म्हणजे ‘गोमाता’ किंवा गाय म्हणजे उपयुक्त पशू हे दोन्ही दृष्टिकोन दोन टोकाचे झाले. कोणतीही झापडबंद विचारसरणी घेऊन चालणार नाही. गाईंपासूनच्या उत्पादनांची स्वतंत्र बाजारपेठच सध्या बनली आहे. गरज आहे ती सामान्यातल्या सामान्य शेतकरी बांधवांना, बचतगटांना, स्वतंत्र महिलांना जाणीव देण्याची, माहिती देण्याची सामान्य शेतकऱ्याला हे बदल माहीत असायला हवेत. संकराबाबतही आंधळे धोरण चालणार नाही. अतिपावसात तग धरणारी केरळची ‘वेच्चूर’ गाय असेल तर त्याच वळूच्या कृत्रिम वीर्यकांडय़ा संकर करण्यासाठी हव्यात. सध्या वंशसातत्य महत्त्वाचे मानले जाते. त्याचेही प्रयोग सर्वाना समजले पाहिजेत. गीर, गवळाऊ, लाल कंधारी, डांगी, खिलार, साहिवाल, देवणी या जातींच्या गाईंच्या पालकांचे संघ आहेत, गट आहेत त्यांचे पत्ते, नंबर्स परस्परांना दिले घेतले पाहिजेत. सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून दुग्धव्यवसाय, गोवंशपालन पुढे नेणाऱ्या भारतीय गोवंशसंवर्धन चळवळीत हे संमेलन महत्त्वाचा पायंडा आहेत. नवजीवन विकास सेवा संस्थेची ही चळवळ गोपालकांना गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारी आहे. महात्मा गांधी भारतीय गाईला आशावादी प्राणी मानत. शेळीला ते गरिबांची गाय मानत. मात्र गोवंश आधारित उत्पन्नातून गरिबांची आर्थिक उन्नती साधणारी चळवळ ज्या प्रमाणात व्हायला हवी तशी झाली नाही. जागतिक बनलेल्या आयुर्वेदाने गोवंशासाठी संधीचे दार उघडले आहे. मरतुकडी, हाडे मोजता येतील अशी, फक्त गोमूत्र व देवघर सारवण्यासाठी शेणच देणारी ‘तांबू-कपिला’ गाय बाळगायची हा प्रश्न प्रत्येक गोपालकाने स्वत: विचारावा. कौटुंबिक आर्थिक विकासासह ग्रामविकास हे सूत्र नव्या कृषी आधारित व्यवस्थेत हवेत. पोपटराव पवार (आदर्श गाव सरपंच-हिवरेगाव बाजार, जि. अहमदनगर), प्रसाद देवधर (भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, कुडाळ) यांचे प्रमुख मार्गदर्शन आहेच. गोवंशाची चळवळ, पालन ग्रामविकासासह पुढे जाईल हे निश्चितच! 

No comments:

Post a Comment