Thursday 19 May 2011

टाळ्या पीटत पावसाच्या पागोळ्या पाहण्याच्या वयातील मुले, या पाण्याचा थेंब न् थेंब साठविण्याचा विचार करू लागली! ही किमया घडली, बालवैज्ञानिक स्पर्धेच्या निमित्ताने! जलसंधारणाच्या विविध पद्धतींचा उहापोह न करता, विद्यार्थ्यांना स्वत:च्या परिसरात राबविता येण्याजोग्या नावीन्यपूर्ण योजनांचे पूर्ण तपशिलासह आराखडे तयार केले. हे आराखडे राबविण्यासाठी त्यांना मान्यता व काही ठिकाणी आर्थिक साहाय्यदेखील मिळाले! हे प्रकल्प मुलांनी तयार केले होते, मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या निमित्ताने! संपूर्ण महाराष्ट्रातील इ. ६ वी व इ. ९ वीची मुले या स्पर्धेत भाग घेतात. स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यांत पूर्ण होते. यंदा ४०,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले व त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली. सर्वाना कुतूहल असलेल्या ‘कृती संशोधन प्रकल्प’ या टप्प्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा आविष्कार व त्यांच्या कल्पनांची झेप उलगडून दोन लेखांमधून वाचायला मिळेल.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर काढून परिसराबद्दल सजग करण्याच्या दृष्टीने दरवर्षी पर्यावरण पूरक विषय निश्चित केला जातो. या विषयावर आधारित प्रयोग, निरीक्षणे, विश्लेषण करून उरपाययोजना सुचविणे अपेक्षित असते. आजपर्यंत पर्यावरण सहिष्णू सण, घरगुती वापरातील घातक रसायने, निसर्ग छंदाची जोपासना, इंधन समस्या, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता यांसारख्या विषयांवर नावीन्यपूर्णज्ञ प्रकल्प विद्यार्थ्यांना सादर केले.
या लेखात इयत्ता सहावीतील मुलांच्या निवडक व प्रातिनिधिक प्रकल्पांचा वेध घेतला आहे. यंदा सहावीसाठी  विषय होता एका मोठय़ा समस्येचा! ती म्हणजे जलसमस्या! पाण्यावरून युद्धे होण्याचे भाकित वर्तविले जात असताना आज आमच्या बालवैज्ञानिकांनी हे युद्ध टाळण्याचे बीज पेरावे अशी आशा होती. त्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला असता त्यांनी ती आशा फलद्रूप केल्याचे समाधान वाटते. हा विषय त्यांच्या मनात नुसता रुजलाच नाही, तर विद्यार्थी कृतिप्रवण झाले आणि कलाविष्कारही घडविला!
जलसंधारण हा म्हटला तर एकदम साधा सोपा विषय. पावसाचे पाणी साठविणे आणि वापरणे म्हणजेच पर्जन्य जलसंधारण (RWH) पण आज असे दिसते की, पावसाळ्यातही घरोघरी पालिकेचे शुद्ध केलेले महागडे पाणी वापरले जाते. डोंगरावरून सगळे पाणी वाहून जाते व पावसाळा संपताच नदी, नाले कोरडे पडतात. सुकलेल्या विंधण विहिरी पूर्णपणे दुर्लक्षिल्या जातात. उन्हाळ्यात शेतकाम ठप्प पडते. पर्जन्य जलसंधारण हा या सर्वावरचा एक सोपा उपाय ठरू शकतो.
वरील सर्व समस्यांवर तसेच घरोघरी जाणविणाऱ्या पाणीटंचाईवर उत्तर शोधणारे परिपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. कल्पकता आणि अचूक निरीक्षणाची चुणूक दाखविण्याच्या काही उल्लेखनीय प्रकल्पाची माहिती आपण घेऊ.
कुमारी श्रद्धा दुर्गे, कात्रप विद्यालय, बदलापूर हिने बदलापूर रेल्वे स्थानकावर कार्यान्वित करता येण्याजोगा प्रकल्प सादर केला. सध्या अस्तित्वात असलेल्या फलाटाच्या छपरावरील पाणी वाहून नेणाऱ्या पाईपांचा तिथे पुरेपूर वापर करून घेतला आहे. हे गोळा झालेले पाणी रेल्वे मार्गिकांमधील गटारांतून विशेष पाईप लाईनमार्गे फलाटाच्या एका टोकाजवळ बांधलेल्या साठवण टाकीत गाळल्यानंतर पोहोचते. साठवण टाकीत पावसाळ्यात जमणारे अतिरिक्त पाणी एका बोअरवेलमध्ये सोडायची योजना आहे. या प्रकल्पामुळे प्रतिदिन रेल्वे स्थानकात लागणाऱ्या ५४००० हजार लिटर पाण्याऐवजी फक्त १४०० लिटर पाणी महानगरपालिकेकडून घ्यावे लागेल, असा तिचा अंदाज आहे.
पाणी बिलात कपात, पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकारात घट व पाण्याची रेल्वे स्थानकांवर कायम उपलब्धता झाल्याने सुधारणारी स्वच्छतागृहे असे या प्रकल्पाचे फायदे आहेत. म्हणूनच या प्रकल्पाला अंबरनाथ रोटरी क्लबतर्फे सात लाख रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. अशाच प्रकारच्या कणकवली रेल्वे स्थानकासाठी (RWH) आराखडा साईराज चव्हाण, एस. एम. हायस्कूल, कणकवली याने दिला आहे.
अ. भि. गोरेगांवकर शाळा, गोरेगाव येथील मल्लिका चौकर या विद्यार्थिनीने ओबेरॉय मॉलमधील दर दिवशी खर्च होणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला. मॉलच्या छतावरील पाणी गोळा करून योग्य रीतीने साठविण्यासाठी सूचना साधार मांडल्या व त्यातून ऑबेरॉय मॉलची पाण्याची बचत कशी होईल हे दाखवून दिले. अशा पाण्याच्या वापरामुळे महानगरपालिकेचे शुद्धिकरण केलेले पाणी मॉल सफाईकरिता वापरले न जाता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी मिळेल.
रत्नागिरी परिसरातील पडिक चिरेखाणीच्या पर्जन्यजलसंधारण व तत्सम कारणांसाठी वापर करण्यासाठी सुयश सावंत, शिर्के प्रशाला, रत्नागिरी व ऊर्जा कुलकर्णी, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, वाशी यांनी प्रकल्प सादर केले आहेत.
सुयशने मांडलेले नाचणे परिसरातील अंदाजे एकूण ५०००० चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या पाच पडिक चिरेखाणीचा नियोजनबद्ध विकास प्रकल्प अत्यंत उल्लेखनीय असा आहे. यात त्याने चिरेखाणीचा उपयोग पाण्याचे पाणी, मत्स्यसंवर्धन, पक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र, शेती बागायती आणि गणेश विसर्जन यासाठी कसा करता येईल याच्या अंदाजपत्रकासह योजना सादर केल्या आहेत.
ऊर्जा हिने लांजा येथील चिरेखाणीचा मानवी वापरांच्या हेतूने जलसंधारणासाठी वापर कोणत्या सुधारणा कराव्या लागतील याचा आढावा घेतला आहे. यात तिने पायऱ्यांची रचना करून तळाशी सहा इंचांचा पेंढय़ाचा थर व त्यावर सिल्पोलिन प्लास्टिकचे आवरण करण्याचे सुचविले आहे. तसेच बाष्पिभवनाचा वेग करण्यासाठी तसेच पशू-पक्ष्यांना पाण्यापासून दूर ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा थर द्यावा असे सांगितले आहे.
कळव्याच्या पारसिक टेकडीवर राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना पाण्याचे दुर्भीक्ष्य नेहमीच जाणवते. ते दूर करण्यासाठी टेकडीवर चर खणून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न शुभंकर काटे, सिंघानिया स्कूल, ठाणे या विद्यार्थ्यांचा आहे. झिरपलेले पाणी अर्धगोलाकार गुहेमध्ये साठवून ते वापरण्याचा आराखडा त्याने दिला आहे.
विरारच्या जीवदानी डोंगरावरून पावसाळ्यात वाहून येणारे पाणी पायथ्यालाच अडविण्याची योजना सौरभ भोई, वर्तक विद्यामंदिर, विरार याने मांडली आहे. डोंगराच्या पायथ्याशी चर खोदून, बंधारे बांधून पाणी अडविल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकते, त्यामुळे भूजल पातळी वाढून परिसर बारमाही हिरवागार राहील, असा त्याला विश्वास वाटतो.
अशाच प्रकारचा प्रकल्प मंडणगडच्या कादवण गावातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेचा विद्यार्थी अद्वैत थत्ते याने सादर केला आहे. गावच्या उत्तरेकडील डोंगरावर विविध बांध घालून तसेच शेततळ्याची योजना करून बारमाही पिके घेण्याची योजना आहे.
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी खड्डे साठविण्याची योजना एकसर, बोरिवली येतील नाल्याचे उदाहरण घेऊन श्रीधर नाईक या सुविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने दिली आहे. नाला बांधून काढून गळती रोखण्याबरोबरच साठलेले पाणी वापरून बारमाही भाजीपाला उगवता येईल असा त्याचा दावा आहे.
पेव्हरब्लॉकचे रस्ते हा मुंबईच्या विकासाला परवलीचा शब्द झाला आहे. ब्लॉक्सची संख्या आणि पाणी झिरपण्याची क्षमता याचा मेळ साधण्याचा प्रयत्न गौरी कानसे या आर. एम. भट विद्यालयाच्या मुलीने केला आहे. पाणी झिरपण्याच्या दृष्टीने जास्त परिमिती असलेले पेव्हरब्लॉक उत्तम असल्याचे तिला आढळून आले आहे.
बागेतील शेततळ्याची क्षमता वाढविण्यासाठी परश्री हॉस्पिटल, अमरावती येथे छतावरील पाणी साठविण्याची योजना, महक राठी, होली क्रॉस हायस्कूल, अमरावती हिने मांडली आहे.
अजय चावरकर, सेंट जोसेफ हायस्कूल, पनवेल यांची कारवॉशसाठी (RWH) करण्याची योजना आहे. पनवेल येतील एच. एम. मोटर्स येथे दुचाकी वाहने धुण्यासाठी अंदाजे तीन लाख लिटर पाणी वर्षभरासाठी उपलब्ध होऊ शकते, हे दाखविले आहे.
वेदांत धांडे, सेंट टेरेसा हायस्कूल, जळगाव याने वाकडी येथे शेततळ्याची योजना कशी करता येईल हे पाहिले आहे. याच विषयावर आदित्य देशपांडे, प्रजाप्रबोधिनी, सांगली व निहार मणेरीकर, कुडाळ यांनी प्रकल्प सादर केले आहेत.
नदी-नाल्यावर बांध घालून पाणी अडविण्यासंबंधी प्रकल्प आदित्य चवांडे (गॅडने हायस्कूल, दापोली); सिद्धेश सातोस्कर (कळसूलकर स्कूल, सावंतवाडी); ईश्वरी उत्पात (राणी लक्ष्मीबाई मुलींची शाळा, आंबोली) यांनी प्रकल्प सादर केले आहेत.
मैदानावर साठणारे पाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी वापरण्याची योजना आहे. ऋतुजा काबाडी, बेडेकर विद्यामंदिर, ठाणे हिची सेंट्रल मैदानावर साठविणारे पाणी जल-तलावाची पातळी कायम राखण्यासाठी तसेच बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरण्याची तिची कल्पना आहे.
पावसाळ्यात गाडीच्या टपावर टाकी बसवून त्यात साठणारे पाणी रस्त्यातील पेट्रोल पंपाच्या कारवॉशच्या टाकीत सोडण्याची अभिनव कल्पना स्वप्निल नाईक, जसूबेन स्कूल, खार याची आहे. अशाच प्रकारे ट्रकवर मोबाईल RWH Unit बसविण्याची योजना मोक्ष सुवर्े्, हीरानंदानी स्कूल, पवई याने सादर केली आहे. हे पाणी ट्रक चालकांनी स्वच्छतेसाठी वापरावे असे त्याचे मत आहे.
अ. भि. गोरेगावकर शाळा, गोरेगाव या शाळेसाठी RWH चा आराखडा अमोघ वडकेने सादर केला आहे. शाळेच्या दोन इमारतींपैकी उंच इमारतीच्या छपरावर साठणारे पाणी लहान इमारतीच्या गच्चीवर टाक्यांमध्ये साठवून स्वच्छतेसाठी वापरण्याची सुटसुटीत योजना त्याने सादर केली आहे.
घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण टाक्यांमध्ये अथवा बोअरवेलच्यिा पुनर्भरणासाठी करण्यासंबंधी अंदाजपत्रक आणि आराखडे यांसह परिपूर्ण प्रकल्प राज्यभरातून आले आहेत.
या मुलांनी परिसरातील पारंपरिक आणि आधुनिक RWH  प्रकल्पाची माहिती घेऊन तिचा उपयोग केल्याचे दिसून येते. मुलांचे परिसर निरक्षिण, सृजनात्मकता, अभ्यासूवृत्ती या साऱ्यांचे मनोज्ञ दर्शन राज्यभरातून आलेल्या या प्रकल्पातून घडते.आपल्या प्रकल्पासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींच्या भेटी घेऊन त्यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थी मिळवितात. यामुळे एकाच विषयावरील राज्यभरातून मिळू शकणारी र्सवकष माहिती संकलित होते. मुलांद्वारे त्यांची कुटुंबे, शाळा आणि स्नेही परिवारांपर्यंत प्रकल्पाची संकल्पना पोहोचते.
दैनंदिन जीवनाची विज्ञानाशी सांगड घालून विज्ञान साक्षरता साधण्याचे मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाचे उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे साध्य होत असल्याचे दिसून येते.
श्रद्धाला मिळालेले अनुदान, माध्यमांनी या मुलांच्या प्रकल्पांची घेतलेली दखल, तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुलांनी मिळविलेली आश्वासने हे सर्व संस्थेसाठी अतिशय आशादायी आणि समाधानकारक आहे.
‘पर्यावरण रक्षणाय, प्रदूषण निग्रहणाय’ या ब्रीदाने भारावलेली मुले हे स्वप्न साकारण्याची चिन्हे आमच्या बालवैज्ञानिकांमध्ये दिसून येतात. या मुलांचे कौतुक करण्यासाठी राजा आणि रेणू दांडेकर या प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ दाम्पत्याने चिखलगाव येथे शिबीर आयोजित केले आहे. तिथे या जलजागरुक मुलांचा मनमेळ साधला जाईल. अशी मुले हेच आपले संचित असणार आहे हे नक्की! (पूर्वार्ध)

No comments:

Post a Comment