Tuesday 10 May 2011


Print
निळवंडय़ाचे पाणी
भाग एक
प्रकाश टाकळकर, अकोले, ८ मे

निळवंडे कालव्याच्या प्रश्नावरून तालुक्यातील वातावरण तापले असून प्रवरेच्या खोऱ्यात निळवंडय़ाच्या पाण्यावरून अस्वस्थता आहे. निळवंडे पाणीहक्क संघर्ष समितीने उच्चस्तरीय कालव्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. तालुक्याच्या बागायत क्षेत्रातून जाणारे निळवंडे धरणाचे कालवे रद्द करावेत व डोंगराच्या कडेने उंचावरून कालवे काढावेत, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. कालव्यात जाणाऱ्या बागायत शेतजमिनी वाचविणे व निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात न येणाऱ्या तालुक्यातील जिरायत भागाला धरणाचे पाणी मिळवून देणे हा या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे.
उच्चस्तरीय कालव्यांचा प्रश्न तांत्रिक व आर्थिक बाबींशी निगडित आहे. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्यांबाबत तालुक्यात, तसेच प्रशासकीय पातळीवर मतभिन्नता दिसून येते. तथापि नदीपात्रापासून दोन्ही बाजूंच्या डोंगररांगापर्यंत सर्व क्षेत्राला निळवंडय़ाचे पाणी मिळाले पाहिजे, यास कोणाचाच विरोध दिसत नाही. अर्थात, जिरायत भागाला पाणी कशा प्रकारे द्यायचे, या बाबत मात्र एकवाक्यता नाही. निळवंडय़ाच्या मूळ लाभक्षेत्रात न येणाऱ्या या कालव्यापासून डोंगरपायथ्यापर्यंत ३ हजार २२७ हेक्टर नवीन क्षेत्रास पाणी कसे उपलब्ध करणार, हा कळीचा मुद्दा आहे.
भंडारदऱ्याचे अकोले तालुका वापरत असणारे पाणी निळवंडे प्रकल्पाकडे वर्ग करून जिरायत भागाला देण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव तालुक्याच्या पचनी पडणारा नसून, तो नवीन असंतोषाला आमंत्रण देणारा आहे. दुसरीकडे निळवंडे पाणीसाठय़ातून या भागासाठी निळवंडय़ात अतिरिक्त पाणी शिल्लक नाही. तथापि निळवंडे लाभक्षेत्रात येणारे भंडारदरा, आढळा धरणांचे लाभक्षेत्र निळवंडे लाभक्षेत्रातून वगळले तर अकोल्याच्या जिरायत भागाला निळवंडे धरणातूनच पाणी देणे शक्य आहे. त्यासाठी निळवंडय़ाच्या लाभक्षेत्राचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे.
निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे अकोले तालुक्यातील लागवडलायक क्षेत्र ७ हजार ४६२ हेक्टर आहे. त्यातील फक्त ४ हजार २३५ क्षेत्र निळवंडय़ाचे सिंचनक्षेत्र आहे. उर्वरित ३ हजार ३३७ हेक्टर क्षेत्र निळवंडे लाभक्षेत्रात येत असूनही त्यास निळवंडय़ातील पाण्याचा थेंबही मिळणार नाही. निळवंडे धरण ही अकोल्याच्या दृष्टीने पाणी मिळविण्याची शेवटची संधी आहे. निळवंडय़ाचे पाणी तालुक्यातील जिरायत भागाला मिळाले नाही तर भविष्यात हा भाग नेहमीच कोरडवाहू राहील, हे वास्तव लक्षात आल्यानंतर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्यापासून ते कालव्यापर्यंत वरील भागात असणारे व त्यामुळे सिंचनापासून वंचित असणारे हे क्षेत्र सिंचनाखाली आणावे, अशी मागणी सुमारे ८-९ वर्षांपूर्वी पुढे आली. त्यातूनच फक्त अकोले तालुक्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय कालवे काढण्याचा पर्याय पुढे आला. निळवंडय़ाचे कालवे ६१०.४० मीटर तलांकावरून निघणार आहेत, तर उच्चस्तरीय कालव्याचा तलांक ६३० मीटर आहे.
पुढे उच्चस्तरीय कालव्याचा विषय मागे पडला व उपसासिंचनाचा पर्याय पुढे आला. त्या अनुषंगाने निळवंडय़ाचे मूळ कालवे ते डोंगरमाथ्यापर्यंत ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास निळवंडे कालव्यातून उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याचा पर्याय पुढे आला. सध्याच्या चर्चेनुसार या ३ हजार २२७पैकी १ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रास उच्चस्तरीय कालव्याद्वारे व १ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रास उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास पाणी कसे देणार यापेक्षा त्यासाठी पाणी कोठून आणणार, ही बाब महत्त्वाची आहे. तालुक्यातील हे ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
निळवंडे धरणासाठी एकूण ८ हजार ४०५ द. ल. घ. फू. पाणीवापर प्रस्तावित आहे. अकोले ४ हजार २३५, संगमनेर २५ हजार ४२८, कोपरगाव ५ हजार ६६६, राहाता १७ हजार २३१, श्रीरामपूर ९९९, राहुरी ८ हजार ८९ व सिन्नर २ हजार ६१२ असे एकूण ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र निळवंडय़ाचे सिंचनक्षेत्र आहे. त्यामुळे ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रासाठी निळवंडे धरणात पाणी शिल्लक नाही. हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी जलसंपदा विभागाने भंडारदऱ्याचे पाणी निळवंडय़ाकडे वळविण्याचा जो पर्याय पुढे आणला आहे, तो रोगापेक्षा औषध घातक असा आहे. भंडारदरा धरणातील अकोले तालुक्याच्या वाटय़ापैकी ४६२ द. ल. घ. फू. पाणीसाठा निळवंडे प्रकल्पात वर्ग करण्यात येऊन त्याद्वारे हे क्षेत्र सिंचनाद्वारे निळवंडे प्रकल्पाच्या पीकरचनेनुसार उपसा सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. या पर्यायास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे.
अकोलेकरांनी तीव्र संघर्ष करून भंडारदऱ्याच्या पाण्यात हिस्सा मिळविला. भंडारदऱ्याच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास असंतोष भडकेल. त्यामुळे जलसंपदा विभागाचा हा पर्याय लोकांना कदापि मान्य होणारा नाही. भंडारदऱ्याचे पाणी वळविता येत नाही. निळवंडय़ातूनच द्यायचे तर कोणाचे तरी पाणी द्यावे लागणार, ते शक्य नाही. निळवंडय़ातून पाणी द्यावे, ही तालुक्यातील जनतेची मागणी आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील ज्या भागास अन्य धरणांचेही पाणी मिळते, ते क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रातून वगळले तरच हे शक्य आहे.
भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र पूर्वी ओझरच्या खाली होते. पण पाण्याच्या फेरवाटपानंतर भंडारदरा धरण ते ओझपर्यंतचे क्षेत्रही भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र बनले. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील ३ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रास भंडारदऱ्याचे पाणी मिळते, तर संगमनेरचे ४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्र भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र आहे. शिवाय आढळा धरणाचे सुमारे अकराशे हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येते.
तालुक्यातील भंडारदऱ्याच्या लाभक्षेत्रापैकी ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असे आहे की जे निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात येत नाही. ते वगळता अकोले-संगमनेर तालुक्यांतील जवळपास ९ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ज्याला निळवंडय़ाबरोबरच आढळा किंवा भंडारदरा धरणांचेही पाणी मिळते. आढळा धरण आठमही आहे. त्याचे व     निळवंडय़ाचे सामायिक क्षेत्र गृहित धरले नाही तरी निळवंडे लाभक्षेत्रात येणाऱ्या सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रास आजही भंडारदरा धरणाचे बारमही पाणी मिळत आहे.
एकाच क्षेत्रासाठी दोन धरणांचे पाणी घेता येत नाही. त्यामुळे हे साडेसात ते आठ हजार हेक्टर क्षेत्र की जे निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रात आहे, पण ज्याला निळवंडय़ाच्या पाण्याची गरज नाही. हे क्षेत्र निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रातून वगळले तर कोणाचेही पाणी कमी न करता निळवंडे धरणातून साडेसात हजारपेक्षा अधिक नवीन क्षेत्रास पाणी देता येईल. निळवंडे लाभक्षेत्राची फेररचना करून निळवंडे लाभक्षेत्रात येणारे भंडारदऱ्याचे लाभक्षेत्र वगळल्यास डोंगरपायथ्यापासून कालव्यापर्यंत अकोले तालुक्यातील ३ हजार २२७ हेक्टर क्षेत्रास निळवंडे धरणातूनच पाणी देता येईल. एवढेच नव्हे, तर संगमनेर तालुक्यातील वंचित भागास अशाच प्रकारे कालव्यावरील उपसासिंचन योजनांद्वारे पाणी देता येणे शक्य आहे.                                            (क्रमश:)    

No comments:

Post a Comment