Thursday 19 May 2011

आज पशुप्रजननामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण बऱ्याच काही गोष्टी प्रयोगांती सिद्ध केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी प्रयोगापर्यंतच मर्यादित, काही पशुचिकिस्थालयापर्यंत, तर काही पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचलेल्या आहेत जसे की, कृत्रिम रेतन हे तंत्र सर्वाच्या ओळखीचे आणि पशुपालकांच्या दारात पोहोचलेले आहे. परंतु यापेक्षाही कमी वेळात जास्त कालवडी देणारे एक तंत्र आज सिद्ध झालेले आहे. ते म्हणजे भ्रूणप्रत्यारोपण, भ्रूण म्हणजे वळूचे शुक्राणू व गाईचे डिंबपेशीचा संयोग होऊन तयार झालेला गर्भ किंवा जीव होय. निसर्गात गायीच्या एका ऋतुचक्रात एक डिंबपेशी अंडाशयातून निघून शुक्राणूशी संयोग पावून गर्भ तयार होतो. म्हणून गाय एका वेतात एकाच वासरास (जुळ्यांचा अपवाद वगळून) जन्म देते परंतु अलीकडे एका उत्तम सिद्ध वळूपासून कृत्रिम रेतन तंत्राद्वारे हजारो वासरे निर्माण करून वळूच्या अनुवंशिकतेचा जसा फायदा घेता येतो. तसेच अधिक दूध देणाऱ्या गायीपासून तिच्या उत्तम उत्पादन क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घेण्याकरिता भ्रूणरोपण तंत्राद्वारे एका वर्षी एकापेक्षा अधिक वासरे निर्माण करता येतात.
यशस्वी भ्रूणप्रत्यारोपण प्रथम इ.स. १८९१ मध्ये सशांमध्ये करण्यात आले. इ.स. १९५१ मध्ये या तंत्राने कोकरू जन्माला आले. १९३० ते १९५० पर्यंत गायीमध्ये भ्रूणप्रत्यारोपण संशोधन कार्य मोठय़ा प्रमाणावर होऊन अमेरिकेत इ.स. १९५१ मध्ये बीज रोपणाने वासरू निर्माण करण्यात आले. तिरुपतीच्या कृषी विद्यापीठात १९८६ साली जन्मलेले वासरू भारतातील भ्रूणप्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे झालेले पहिले वासरू होय. याप्रकारे भारतामध्येही विविध संशोधन संस्थांमध्ये भ्रूणप्रत्यारोपणाचे यशस्वी प्रयोग करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचा विचार करता या तंत्रज्ञानाचा अवलंब प्रथम शाम झंवर यांनी धुळे येथे तर डॉ. सुरेश गंगवणे यांनी नाशिकमध्ये केला. महाराष्ट्राच्या पशुसंगोपन क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड आहे.
भ्रूणप्रत्यारोपणाचे फायदे -
१) भ्रूणप्रत्यारोपण या क्रियेत सुपर ओव्हुलेशन पद्धतीने एकाच माजात सुमारे ५ ते ६ स्त्रीबीजे मिळवता येतात. त्यामुळे एका जातीच्या गायीपासून तिच्या आयुष्यात ४० ते ५० वासरे मिळवता येऊ शकतात.  २) गर्भाशयात भ्रूणरोपण करण्यापूर्वीच वासराचे लिंग ठरविता येते. ३) समागमातून पसरणाऱ्या रोगावर आळा घालता येतो. ४) एका मोठय़ा गुरास जितक्या खर्चात एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येईल तितक्याच खर्चात अनेक भ्रूण नेता येतात. ५) भ्रूणरोपणामुळे हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट मोठय़ा गुरांना एका हवामानातून दुसरीकडे नेण्याचा त्रास होतो. ६) भ्रूण अवस्थेत भ्रूणाचे विभाजन करून एकसारखीच दोन वासरे निर्माण करता येतात. ७) या पद्धतीत ज्या मादीत स्त्री बीज तयार होते, पण गर्भधारणा होऊ शकत नाही, अशा माद्या वापरता येतात. तसेच ज्या माद्या वांझ आहेत. त्यांचा प्राप्तकर्ती मादी म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. ८) भ्रूण प्रत्यारोपण पद्धतीत लैंगिकदृष्टय़ा अपरिपक्व अशा मादीपासूनसुद्धा भ्रूण मिळविता येतात. ९) प्राप्त झालेले गर्भ अतिशय कमी म्हणजे -१९६ अंश से. तापमानाला वर्षांनुवर्षे सुस्थितीत ठेवता येतात आणि पाहिजे तेव्हा प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. १०) तसेच एकाच गर्भापासून त्याचे प्रत्यारोपण करण्यापूर्वी विभाजन करून जुळे किंवा तिळे निर्माण करता येऊ शकतात. ११) या पद्धतीने उच्च वंशावळ असलेल्या कालवडींची निर्मिती होऊन भविष्यात त्यांचेपासून भरपूर दुग्धोत्पादन मिळविता येते आणि गोऱ्हे निर्माण झाल्याने ते उच्च वंशावळीचे असल्याने त्यांचा वापर कृत्रिम रेतन कार्यासाठी लागणाऱ्या अतिशीत विर्यमात्रा निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो.
भ्रूणप्रत्यारोपणामध्ये फलित बीज देणारी गाय व ज्या गाईमध्ये रोपण करावयाचे ती गाय या दोघीही माजाच्या एकाच अवस्थेत असणे आवश्यक असते. त्यासाठी दात्या गाईला पूर्वीच्या माजानंतरच्या दहाव्या व अकराव्या दिवशी गाभण घोडीच्या रक्तजलातील गोनॅगेट्र्ॉपीन’ या संप्रेरकाने (२००० युनिट) इंजेक्शन देण्यात येते त्यानंतर दोन दिवसांनी तिला प्रोस्टाग्लॅडिनचे १ मि.ग्रॅ. इंजेक्शन दिले जाते ही गाय सुमारे ३-४ दिवसांत माजावर येते. माजावर आल्यावर किंवा माजाची लक्षणे दिसली नाहीत तरीही ७२ व ९६ तासांनी तिला रेतन केले जाते. रेतनानंतर ६, ७ किंवा ८ व्या दिवशी तिच्यापासून फलित बीज काढून घेण्यात येते.
फलित बीजाचा स्वीकार करणाऱ्या दाई गायीला ५०० मि.ग्रॅ. प्रोस्टाग्लॅडिनचे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर ही गाय ३-४ दिवसांत माजावर येते माजावर आल्यापासून ७ किंवा ८ व्या दिवशी दात्या गाईचे फलित बीज काढून घेऊन दाई (घेणाऱ्या) गाईचे गर्भाशयात सोडण्यात येते. गोठवलेल्या भ्रूण प्रत्यारोपणाच्या तंत्रामध्ये दाता व दाई गायींच्या माजाच्या अवस्थेचा विचार करावा लागत नाही. माजानंतर किंवा ८ व्या दिवशी दाई गायीमध्ये भ्रूणप्रत्यारोपण केले जाते. सुरुवातीला फलित बीज काढून घेण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची पद्धत वापरात होती. परंतु सध्या गर्भाशय धुवून हे फलित बीज मिळविता येते. त्यासाठी फोलीकॅथेटर साधनाचा वापर केला जातो. प्रत्यारोपणास कृत्रिम रेतन पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या साधनासारखेच साधन वापरून भ्रूणप्रत्यारोपण केले जाते.
या सर्व प्रक्रियेत एकापेक्षा जास्त स्त्रीबीज निर्मितीसाठी लागणारी संप्रेरके बाहेरच्या देशातून मागवावी लागतात. आणि तसेही ही थोडी महागडी पद्धत असल्याने सर्वसामान्य पशुपालकांना सध्यातरी परवडणार नाही. परंतु हे तंत्रज्ञान सद्यस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेले नाही. पण पुढील काही वर्षांत पोहोचणे शक्य आहे.

No comments:

Post a Comment