Tuesday 10 May 2011


निळवंडे प्रकल्प चारमाहीच ठरण्याची भीतीPrint
सिंचन नियोजनाबाबतही साशंकता
निळवंडय़ाचे  - पाणी - ३
प्रकाश टाकळकर , अकोले, १० मे

केंद्रीय जलआयोगाच्या सूचनेप्रमाणे निळवंडे प्रकल्पाची विश्वासार्हता ५० टक्क्य़ांवरून ७५ टक्के केल्यामुळे पाण्याची उपलब्धता मूळ नियोजनापेक्षा तीन टीएमसीने कमी झाली. पाणी उपलब्धता कमी झाली असली, तरी धरणाची साठवणक्षमता अगर लाभक्षेत्रात मात्र कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळेच आता ८ हजार ४०५ द. ल. घ. फू. पाण्यात ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे.
बाष्पीभवनामुळे पाण्याचा नाश, बुडीत क्षेत्रासाठी राखीव पाणी, मृत जलसाठा, कॅनॉल लॉसेस आदी बाबी विचारात घेता आठ महिने एवढय़ा क्षेत्राला पाणी मिळण्यात साशंकता आहे. त्यामुळेच भविष्यात आठमही निळवंडे धरण प्रत्यक्षात चारमहीच तर ठरणार नाही ना, अशी भीती जाणकारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
आठमही सिंचन धोरण लागू होणारा निळवंडे हा राज्यातील पहिलाच मोठा सिंचन प्रकल्प. ५० टक्के विश्वासार्हतेनुसार उपलब्ध होणाऱ्या जलनिष्पत्तीनुसार या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. त्यापूर्वी ७५ टक्के विश्वासार्हतेनुसार सिंचन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असे. ५० टक्के विश्वासार्हता म्हणजे धरण १०० वर्षांत ५० वेळा, तर ७५ टक्के विश्वासार्हता म्हणजे याच कालावधीत ते ७५ वेळा भरेल. विश्वासार्हता कमी केली की पाण्याची उपलब्धता वाढते. त्यामुळे जास्त क्षमतेचे धरण बांधता येते. त्याचा लाभ अधिक क्षेत्राला देता येतो. दुष्काळी भागातील अधिकाधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने त्रिसदस्य समितीने आठमही सिंचन धोरण व ५० टक्के विश्वासार्हतेनुसार उपलब्ध जलनिष्पत्तीप्रमाणे पाणी वापराची शिफारस केली. त्याप्रमाणे या ऊध्र्व प्रवरा प्रकल्पाचे (निळवंडे धरण) नियोजन करण्यात आले.
५० टक्के विश्वासार्हतेनुसार निळवंडय़ासाठी ११.५० टीएमसी पाणी उपलब्ध होते. निळवंडे जलाशयाचे लेक लॉसेस ४४५ द. ल. घ. फू. गृहित धरण्यात आले. ते वजा जाता ११ हजार ५५ द. ल. घ. फू. पाणी कालव्याद्वारे सिंचनासाठी उपलब्ध होते निळवंडे धरणातून फक्त खरीप व रब्बी हंगामांत (खरीप ४५ व रब्बी ५५ टक्के) सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. निळवंडे प्रकल्पाच्या पीक रचनेप्रमाणे सुधारित पेनमन पद्धतीनुसार एक हजार एकर क्षेत्राच्या सिंचनासाठी खरीप हंगामात २८.५२ द. ल. घ. फू. व रब्बी हंगामात ४१.१३ द. ल. घ. फू. असे एकूण ६९.६५ द. ल. घ. फू. पाणी आठमही पद्धतीने लागते. त्यामुळे उपलब्ध ११ हजार ५५ द. ल. घ. फू. पाण्यात १ लाख ५८ हजार ७२२ एकर म्हणजेच ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र भिजू शकते. म्हणून निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र आहे ६४ हजार २६० हेक्टर. खरीप व रब्बी हंगामांतील जुलै ते फेब्रुवारी या आठ महिन्यांच्या काळात धरणातून पाणी सोडले जाणार आहे. खरीप व रब्बीमध्ये पाण्याची गरज व सिंचनक्षेत्र लक्षात घेऊन धरणाची साठवणक्षमता ८.३२ टीएमसी निश्चित करण्यात आली. मात्र, ५० टक्के विश्वासार्हतेनुसार प्रकल्पाच्या नियोजनाला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळू शकली नाही.
मूळ म्हाळादेवी प्रकल्पास नवी दिल्ली येथील योजना आयोगाने १५ फेब्रुवारी १९७७ला मान्यता दिली. मात्र, धरणाची जागा व लाभक्षेत्र यांच्यात मोठे बदल झाल्यामुळे ऊध्र्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे) पुन्हा केंद्रीय जलआयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला. मात्र, त्यास मान्यता न देता ७५ टक्के विश्वासार्हता गृहित धरून सुधारित प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय जलआयोगाने सप्टेंबर २००१मध्ये जलसंपदा विभागास केली. त्याप्रमाणे प्रकल्पाचे फेरनियोजन झाले. मात्र, लाभक्षेत्रात कोणताही बदल न करता सर्व क्षेत्रास पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पीकरचना पद्धतीत बदल करण्यात आले. तथापि दोन वर्षांपूर्वी केंद्रीय जलआयोगाच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रानुसार ७५ टक्के विश्वासार्हतेप्रमाणे निळवंडय़ासाठी फक्त ८.४० टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आता ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्रासाठी फक्त ८ हजार ४०५ द. ल. घ. फू. पाणीवापर प्रस्तावित केला आहे. या साठी पुन्हा पीकरचना पद्धत बदलण्यात आली. त्यास सरकारची मान्यता मिळाली. केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
विश्वासार्हता बदलावी लागल्यामुळे प्रकल्पाच्या मूळ नियोजनापेक्षा (११.५ टीएमसी) उपलब्धता तीन टीएमसी कमी (८.४० टीएमसी) झाली. पाणी उपलब्धता कमी झाल्यामुळे सिंचनक्षेत्र १५-१६ हजार हेक्टरने कमी होत होते. पण तसे केले तर त्याचे तीव्र पडसाद लाभक्षेत्रात उमटले असते. त्यामुळे लाभक्षेत्र कमी न करता कागदावर आकडय़ांचा ताळमेळ घालण्यात आला.
निळवंडे धरणाची साठवणक्षमता आहे ८ हजार ३२० द. ल. घ. फू. नियमाप्रमाणे धरणाचे ६ टक्के पाणी बुडीत क्षेत्रासाठी राखीव असते. म्हणजेच निळवंडय़ातील सुमारे ५०० द. ल. घ. फू. पाणी बुडीत क्षेत्रासाठी राखीव आहे. धरण जलाशयातून तीन उपसासिंचन योजनांची कामे हाती घेण्यात आली. चार योजना प्रस्तावित आहेत. निळवंडे धरणातील या योजनांमुळे ३ हजार ८५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे मानले जाते. निळवंडे धरणाचे लेक लॉसेस आहेत ४५५ द. ल. घ. फू. वर्षभरात बाष्पीभवनामुळे धरणातील एवढय़ा पाण्याचा नाश होणार आहे. धरणाचा मृतसाठा आहे २५७ द. ल. घ. फू. या बाबी विचारात घेतल्यास सिंचनासाठी फक्त ७ हजार १०० द. ल. घ. फू. पाणी शिल्लक राहते. शिवाय निळवंडे धरणाच्या कालव्याचा विमोचक ६१०.४० मीटर तलांकावर आहे. या पातळीला पाणीसाठा आहे ८५० द. ल. घ. फू. (धरणातील एवढे पाणी कालव्याद्वारे बाहेर काढता येणार नाही) या सर्व बाबी लक्षात घेतल्यास प्रत्यक्ष सिंचनासाठी सात टीएमसी पाणीही मिळणार की नाही अशी शंका आहे. धरण  क्षमता व लाभक्षेत्र याचा अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मेळ घातला असला, तरी ते नियोजन प्रत्यक्षात कसे येणार, या बाबत साशंकता आहे.
भंडारदऱ्याचा संदर्भ घेतल्यास या शंकेत निश्चितच तथ्य जाणवते. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा लाभ सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रास होतो. भंडारदऱ्याच्या एका आवर्तनात सुमारे दीड ते दोन टीएमसी पाणी लागते. निळवंडय़ाचे लाभक्षेत्र भंडारदऱ्याच्या जवळपास दुप्पट आहे. भंडारदऱ्याचा निकष लावला तर भरलेल्या निळवंडय़ातून पूर्ण क्षेत्रासाठी फार तर तीन आवर्तने होऊ शकतील, असा अंदाज आहे. तसे झाले तर आठमही निळवंडे प्रत्यक्षात चारमहीच ठरण्याची शक्यता आहे. अर्थात, वर्षांनुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या दुष्काळी भागास एवढे पाणीही दिलासा देणारे ठरेल. त्यासाठी तरी निळवंडय़ाचे कालवे लवकर होणे गरजेचे आहे.(क्रमश:)

No comments:

Post a Comment