Tuesday 10 May 2011




चिचोंडीतील प्रकार : रोहित्राच्या दुर्दशेकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक!Print
राजूर, १० मे/वार्ताहर
येथून जवळच असलेल्या चिचोंडी गावात वीज कंपनीचा अजब कारभार सुरू असून, परिसराला वीजपुरवठा करणारे रोहित्र पूर्ण फुटके, तसेच काही वीजखांबही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. राजूरच्या वीज अधिकाऱ्यांचे या बाबत लक्ष वेधले, तसेच भंडारदरा विभागाचे अभियंता अली यांनाही प्रत्यक्ष दाखविले. मात्र, रोहित्र दुरूस्त केले जात नसल्याने चिचोंडीच्या रहिवाशांनी आता भंडारदरा वीज कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देतानाच वीज कंपनीच्या मुख्य अभियंत्यांचे लक्ष वेधण्याचे ठरविले आहे.
चिचोंडीतील मुख्य रस्त्यावर असणारे रोहित्र पूर्णपणे फुटले असून, तारांवरील प्लास्टिकचे आवरण निघाले आहे. त्यामुळे याचा धोका निर्माण झाला आहे. राजूर वीज कार्यालयातील सहायक अभियंता कुलकर्णी यांचे या कडे लक्ष वेधले. मात्र, त्यांनी कानावर हात ठेवले. भंडारदरा येथील अभियंता अली यांना हे टाऊक असूनही त्यांचे या कडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे कंटाळलेल्या गावकऱ्यांनी आता भंडारदरा येथील वीज कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. चंद्रकांत बांगर, सुरेश गभाले, ललित पवार आदींनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.    

1 comment: